*सानेगुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून धीरज घाटे यांचा आणखीन एक घोटाळा उघड..*
_पुणे मनपा आणि धर्मादाय आयुक्तालयाची घाटेंकडून फसवणूक.._
पुणे: मनपाच्या अंदाजे साडेतीन कोटी रुपये मूल्यातील मालमत्तेचा अवघ्या काही हजार रुपयांत करार करून माजी नगरसेवक धीरज घाटे यांना ताबा देण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे थेट शासकीय मालमत्तेची फसवणूक झाली आहे. कोणतेही दस्तऐवजी सत्यापन न करता करण्यात आलेला हा करार संपूर्णपणे संशयास्पद आहे. यापूर्वीही माजी नगरसेवक धीरज घाटे यांच्याविरोधात वीज चोरी, मनपाच्या इमारतींचा गैरवापर, आणि भ्रष्टाचारासंबंधी आरोप सार्वजनिक स्तरावर मांडण्यात आले होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गणेश मंडळाचा आधार घेत घाटेंनी पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तेवर बेकायदेशीर पद्धतीने केलेल्या करारनाम्याविरोधात सागर धाडवे यांनी तक्रार केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या मालकीची भानुदास गेजगे व्यायामशाळा आणि परिसरातील माजी नगरसेवक धीरज घाटे यांचे कार्यालय या जागेवर बेकायदेशीर व अपारदर्शक पद्धतीने करण्यात आलेल्या करारनाम्याविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते सागर धाडवे यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी सदर करारनाम्यात गंभीर त्रुटी आणि भ्रष्टाचाराच्या बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
सदर मालमत्तेचा करार सानेगुरुजी तरुण मंडळ या संस्थेसोबत करण्यात आला असून, महापालिकेने अवघ्या २१,००० रुपयांच्या वार्षिक भाडेतत्त्वावर सार्वजनिक मालमत्ता त्यांच्या ताब्यात दिली आहे. हा करार २१ मे २०२५ रोजी झाला असून, त्यामागे राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय दुर्लक्ष असल्याचे धाडवे यांनी म्हटले आहे.
या करारामध्ये सादर करण्यात आलेले ट्रस्ट डॉक्युमेंट सन २००२ मधील असून, त्यानंतर कोणताही चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आलेला नाही. तसेच धीरज घाटे यांनी शिवाजी मोहन जावीर यांना मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून पत्राद्वारे नमूद केले असले तरी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत नोंदीनुसार धनंजय विष्णू जाधव हेच उपाध्यक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, संस्थेने धर्मादाय कायद्यानुसार कोणताही वार्षिक अहवाल अथवा लेखापरीक्षण अहवाल सादर केलेला नाही, ही बाबदेखील गंभीर आहे. धीरज घाटे यांच्या लेटरहेडवर उपाध्यक्ष म्हणून नमूद केलेल्या व्यक्तीचे नाव ट्रस्टमध्ये अधिकृतपणे नोंदलेले नाही. यावरून हे स्पष्ट होते की, पालिकेची मालमत्ता एका संशयास्पद आणि नियमभंग करणाऱ्या संस्थेकडे स्वस्तात वळवण्यामागे काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध कार्यरत होते.
सध्या सुरु होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांकडून लाखो रुपयांच्या वर्गण्या गोळा केल्या जात आहेत. मात्र या पैशांचा उपयोग स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी धीरज घाटे करत असून अनेक वर्गणीदारांसह पुणे महानगरपालिका आणि धर्मादाय आयुक्त यांची घाटेंकडून उघडपणे फसवणूक केली आहे.
या प्रकरणात सागर धाडवे यांनी महापालिकेकडे सदर करारनाम्याची तात्काळ चौकशी करण्याची, त्याची कायदेशीर वैधता तपासून तो रद्द करण्याची, संबंधित अधिकारी व व्यक्तींवर कारवाई करण्याची तसेच सानेगुरुजी मंडळाच्या धर्मादाय नोंदी, आर्थिक व्यवहार आणि पात्रतेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात सार्वजनिक मालमत्ता वाटपासाठी पारदर्शक आणि उत्तरदायीत्व असलेले धोरण तयार करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सार्वजनिक मालमत्ता ही नागरिकांची असते आणि तिचा गैरवापर लोकशाही व्यवस्थेला धोका पोचवणारा असतो, म्हणूनच महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देत योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती धाडवे यांनी केली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















