पुणे: हडपसर परिसरातील एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे पोलीस गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ‘एस.पी. बॉडी फिटनेस’ या मसाज सेंटरवर टाकलेल्या छाप्यात ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, ५५ वर्षीय महिला चालकाला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
हडपसर गाडीतळ येथील वैभव थिएटर शेजारी असलेल्या ‘भोसले आर्केड’ इमारतीमधील शॉप नं. २ मध्ये “एस.पी. बॉडी फिटनेस” या नावाने मसाज सेंटर चालवले जात होते. या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला (AHTU) मिळाली होती.
मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. खात्री पटताच पोलिसांनी दिनांक ८ मे २०२६ रोजी तिथे अचानक छापा टाकला. या कारवाईत मसाज सेंटरमध्ये असलेल्या ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
मॅनेजरला अटक
या मसाज सेंटरची मालकीण आणि मॅनेजर आशा मुकेश गोरे (वय ५५ वर्ष, रा. गंगा व्हिलेज हांडेवाडी, हडपसर) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्या विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (भा.न्या.स.) कलम १४३ (१) (३) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, जाधव, केदार, रसाळ, कोंडे आणि महिला पोलीस अंमलदार खेडेकर यांचा समावेश होता.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























