सराईत गुन्हेगार शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ शस्त्रासह फिरत होता, रंगेहाथ पकडला
पुणे (शशिकांत पाटोळे) l दि; १३ मार्च २०२६ : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. शहरात अनेकदा गँगवारच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे अनेकदा पुण्यातील गुन्हेगारीचं वास्तव समोर आलं आहे.अशा घटनांमुळे पुणे पोलिसांकडूनही गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात. चुकीचं कृत्य करणाऱ्या किंवा दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी वेळोवेळी नांग्या ठेचल्या आहेत.
तसेच त्यांची धिंड देखील काढलेली बघायला मिळाली आहे. असं असलं तरी काही गुन्हेगार शांत राहताना दिसत नाही. ते सर्रासपणे शस्त्र बाळगतात. पण पोलीस अशा गुन्हेगारांविरोधात नेहमी कठोर कारवाई करतात. आतादेखील पोलिसांनी अशीच कारवाई केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी पिस्तुल बाळगून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार दीपक चव्हाण आणि सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक सराईत गुन्हेगार शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात गावठी पिस्तुल घेऊन येणार आहे.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने परिसरात सापळा रचला. पोलीसांनी संशयित हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ अनिल बोराडे (वय २०, रा. ज्ञानेश्वर नगर, तळेगाव दाभाडे) असे आहे. पोलीसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्यावर यापूर्वीही शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच तळेगाव दाभाडे येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सध्या आरोपीकडे मिळालेले गावठी पिस्तुल नेमके कोठून आणि कोणाकडून मिळाले याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. ही कारवाई सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या नेतृत्वात गुन्हे तपास पथकाने केली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























