पुणे महापालिकेने ईद-उल-अजहा (बकर ईद) च्या दुसऱ्या दिवशी, दिनांक ८ जून रोजी, सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय मुस्लिम समाजाच्या मूलभूत नागरी हक्कांवर अन्यायकारक असल्याचे मत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी संघटनांनी मांडले आहे.
या संदर्भात राजकीय विश्लेषक, अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक विचारवंत अन्वर शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या पक्षपाती भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर मुस्लिम समाजाकडून मनपाला टॅक्स भरला जातो, तर त्यांना सार्वजनिक बागा, उद्याने वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. एक खासदाराच्या तोंडी सूचनेवरून सार्वजनिक बाग बंद करणे, ही लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात जाणारी कृती आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
ईदच्या दुसऱ्या दिवशी अनेक मुस्लिम कुटुंबे आपल्या मुलांसह फिरण्यासाठी सारसबाग आणि इतर बागांमध्ये जातात. या दिवसाचे महत्त्व सामाजिक सलोखा, कौटुंबिक आनंद आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करणारे असते. मात्र, यावर्षी विशेष कारण न देता फक्त एका लोकप्रतिनिधीच्या सूचनेवरून सारसबाग बंद ठेवण्यात आले, ही घटना मन हेलावणारी असल्याचे नागरिक म्हणत आहेत.
अनुर शेख यांनी अधिकृतरित्या मागणी केली आहे की:
1. पुणे महापालिकेने सारसबाग बंद ठेवण्यामागील कारण स्पष्ट करावे.
2. भविष्यात कोणत्याही धार्मिक समुदायाच्या भावना दुखावणारे निर्णय टाळावेत.
3. मुस्लिम समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.
4. लोकप्रतिनिधीच्या दबावात येऊन सार्वजनिक सुविधा बंद करू नयेत.
ही घटना एकाच धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याची भावना समाजात निर्माण होत असून, या प्रकारामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निरीक्षण आहे.
सार्वजनिक ठिकाणे ही सर्व नागरिकांसाठी खुली असावी, हाच लोकशाहीचा गाभा आहे. कोणत्याही धर्म, जाती किंवा वर्गावर अन्याय न होता सर्वांनी एकत्र, समान अधिकाराने जगावे, हीच खरी ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ची कल्पना आहे.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.