विश्रांतवाडी परिसरातील वृक्षतोडीविरोधात संताप
पुणे | विश्रांतवाडी – टिंगरे नगर रोड
विश्रांतवाडी परिसरातील दोन झाडे विनाकारण कापण्यात आल्याचा आरोप करत पुणे पँथर सेनेचे अध्यक्ष सचिन भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित झाडे कोणताही मोठा अडथळा निर्माण करत नसतानाही मोठ्या प्रमाणावर छाटणी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.पालिकेकडून फक्त ३ ते ४ धोकादायक फांद्या कापण्याची परवानगी दिली होती, पण ठेकेदारा ने संपूर्ण झाडाची छत्री कापून फक्त बुंधा ठेवला आहे.
या वेळी सचिन भोसले म्हणाले की, पुणे महानगरपालिका धोकादायक शासकीय इमारती किंवा सरकारी दवाखाने तात्काळ पाडत नाही, मात्र झाडांच्या बाबतीत प्रशासन घाईने निर्णय घेत असल्याचे दिसते. पालिकेकडून फक्त ३ ते ४ धोकादायक फांद्या कापण्याची परवानगी दिली जाते, पण काही ठेकेदार संपूर्ण झाडाची छत्री कापून फक्त बुंधा ठेवतात. अशा चुकीच्या छाटणीमुळे अनेक झाडे मरून जात असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी सचिन भोसले यांनी आगाखान पॅलेस शेजारील, नगर रोड परिसरातील वृक्षतोडीचाही उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी विकासकामांच्या नावाखाली अंदाजे २० ते ३० झाडे कापण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “एक झाड पूर्ण वाढण्यासाठी अनेक दशके लागतात. त्याची भरपाई ना पैशाने होऊ शकते, ना नवीन झाडे लावून. पालिका अधिकारी पुनर्लागवडीच्या गोष्टी करतात, पण जुन्या वृक्षांची जागा सहज भरून निघू शकत नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
सचिन भोसले यांनी मागणी केली की, पुणे महानगरपालिका आयुक्त व महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे. झाडांची छाटणी करताना संबंधित पालिका अधिकारी उपस्थित असावेत तसेच ठेकेदार व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे.
स्थानिक नागरिकांच्या मते, भविष्यातील विकासकामांसाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने झाडे हटवली जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याचा ग्रीन कव्हर सातत्याने कमी होत असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.
याशिवाय, मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी पुणे महापालिकेच्या वृक्ष नियोजनावर ताशेरे ओढल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
शेवटी सचिन भोसले यांनी इशारा देत म्हटले की,
“विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे मान्य नाही. प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर पुणे पँथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. पर्यावरण वाचेल तरच देश वाचेल.”
— समाप्त —

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























