पुणे, प्रतिनिधी:
भारताचे माजी पंतप्रधान आणि ‘जय जवान जय किसान’चे प्रणेते लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारक व पर्णाकृती पुतळ्याच्या अनधिकृत तोडफोडीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या (मनपा) मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. सलग तीन दिवस चाललेल्या या तीव्र आंदोलनानंतर, महापालिका प्रशासनाने नमती भूमिका घेत सकारात्मक चर्चा केली आणि त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. 
या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. ३) कार्यालयाकडून अधिक्षक अभियंत्यांच्या स्वाक्षरीने आंदोलक श्री. प्रतिक विलास आल्हाट यांना लेखी पत्र (जा.क्र. झोन क्र. ३/१५६१, दिनांक ३/६/२०२६) देखील जारी करण्यात आले आहे.
मनपा प्रशासन आणि शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा
शिवसेना गटनेते नितीन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपा शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयात आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात सविस्तर बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले:
संयुक्त पाहणी व आराखड्यात बदल: पुणे मनपाचे वरिष्ठ अधिकारी बिपीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक व स्मारक समितीच्या उपस्थितीत स्मारकाची पुन्हा एकदा संयुक्त पाहणी केली जाईल. मूळ स्मारकाची जागा, क्षेत्रफळ व प्रतिष्ठा अबाधित ठेवून, यापूर्वी शहर सौंदर्याकरण समितीच्या मान्यतेनुसार दिलेल्या वर्क ऑर्डरमधील नकाशामध्ये पथ विभाग व ट्रॅफिक (वाहतूक) विभाग यांच्याकडून अहवाल घेऊन योग्य ते बदल केले जातील आणि त्यानुसारच पुढील काम केले जाईल.
२४ तास सुरक्षा रक्षक: स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या व स्मारकाच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात येईल.
पारदर्शकता आणि नियमांचे पालन: सक्षम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्मारकाचा आराखडा, आवश्यक परवानग्या व संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून ती सार्वजनिक केली जाईल. तसेच महापुरुषांच्या पुतळे व स्मारकांबाबत शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई: स्मारकाबाबत जागेवर केलेल्या कामाचा आढावा घेऊन, या प्रकरणातील बेजबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनाचा खुलासा
प्रशासनाने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या शहर सौंदर्याकरण समितीअंतर्गत विविध विकसकांकडून सी.एस.आर. (CSR) फंडातून शहरातील सुशोभीकरणाची कामे केली जातात. त्याअंतर्गतच दांडेकर पूल येथील शास्त्रीजींच्या पुतळ्याभोवतालचे जुने बांधकाम काढण्यात आले होते. या कामामध्ये पुतळा स्थलांतरित करण्याचा प्रशासनाचा कोणताही विचार किंवा नियोजन नाही.
लोकशक्तीचा विजय
प्रशासनाने मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून, हे यश जनतेच्या एकजुटीचे व लोकशक्तीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. तसेच महापुरुषांच्या स्मारकांबाबत प्रशासनाने भविष्यात संवेदनशीलतेने वागावे, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.
बैठकीला उपस्थित असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते:
या महत्त्वपूर्ण बैठकीला आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षांचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी: प्रमुख आंदोलक प्रतीक आल्हाट, सहसंपर्क प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पुणे मनपा गटनेते नितीन गावडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक किशोर राजपूत, युवासेनेचे सनी गवते, परेश खंडके, नीरज नांगरे, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, दिलीप पोमण, अतुल दिघे, दत्ता घुले, विभागप्रमुख चंदन साळुंके, रूपेश पवार, नितीन दलभंजन, सूरज रानवडे, राकेश गायकवाड, जगदीश रेड्डी, गिरीश गायकवाड, रणजीत शिंदे, गणेश घोलप, काका लडकत, मनीष जाधव, संजय गवळी आणि हेमंत जोशी.
काँग्रेस पदाधिकारी: प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, युवक काँग्रेसचे सागर धाडवे, दिनकर कोतकर, मनीषा फाटे, वैभव जोशी, विजय तिकोने, शशांक पाटील, शेखर पवार, आशिष गुंजाळ, नंदू पापल, गणेश ठोंबरे, रमण पवार आणि रवी आरडे.
शिवसेना महिला आघाडी: करुणा घाडगे, सविता गोसावी, रोहिणी कोल्हाळ आणि अयोध्या डोहीफोडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.























