अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवरही गुन्हा दाखल होणार?
पुणे (शशिकांत पाटोळे) l दि; २७ मार्च २०२६ : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेली जवळीक राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांना चांगलीच भोवली. चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
आता चाकणकर यांच्याकडे असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर देखील टांगती तलवार आहे. असे असताना आता याप्रकरणात रुपाली चाकणकर यांना त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरेंनी घेरल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या व झाशीची राणी प्रतिष्ठानच्या रूपाली ठोंबरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संयुक्तपणे शुक्रवारी (दि. २७) नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. यावेळी रुपाली ठोंबरे यांनी आपण राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केल्याची माहिती दिली.
दरम्यान चाकणकर व रुपाली ठोंबरे या दोघीही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. पण रुपाली पाटील ठोंबरे या चाकणकरांच्या प्रतिस्पर्धी होत्या. चाकणकरांना दुसऱ्यांदा महिला आयोगाचे अध्यक्षपद दिल्यानंतर रुपाली पाटील यांनी बराच थयथयाट केला होता. फलटण प्रकरणात रुपाली चाकणकरांवर टीका करायलाही रुपाली पाटील ठोंबरे सगळ्यात पुढे होत्या. आताही एकाच पक्षात असताना भोंदूबाबा खरात प्रकरणात चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी ठोंबरे यांनी पुढाकार घेतला आहे.
रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली ठोंबरे व सुषमा अंधारे या दोघींनी एकत्रितपणे ताकद लावल्याचे दिसत आहेत. दोघींनी संयुक्तपणे याप्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेतली. पोलिस आयुक्तांच्या भेटीनंतर अंधारे व ठोंबरे दोन्ही महिला नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, पोलिस आयुक्तांसोबत आमचे प्राथमिक स्तरावर बोलणे झाले. या प्रकरणात त्यांनी एफआयआर नोंदवून घेतली आहे. पण त्यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे एसआयटीकडे वर्ग केली आहेत. त्यातून एवढीच गोष्ट कळाली आहे की, अशोक खरात प्रकरणाचा सगळा तपास एसआयटीकडे गेल्याने पोलिस आयुक्तांना त्यावर काहीही भाष्य करता येणार नाही. त्यामुळे आता आम्ही एसआयटी पथकाची भेट घेणार आहोत अशी माहिती अंधारे यांनी दिली.
रुपाली ठोंबरे यांनी सांगितले की, खरात ज्या प्रकरणात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहर पोलिसांनी दाखल केलेला असून तातडीने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे गेला आहे. मी झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने रुपाली चाकणकर यांना तत्काळ अटक केली पाहीजे अशी मागणी केल्याचे ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रूपाली चाकणकर या भोंदू अशोक खरात याचे पाय धुताना देखील दिसल्या होत्या, तसेच खरातच्या डोक्यावर छत्री धरतानाही दिसल्या. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओ व फोटोमुळे राज्यात खळबळ उडाली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























