बापू सोनवणे कार्यकारी संपादक
पुणे, प्रतिनिधी : थेऊरफाटा-लोणीकंद अष्टविनायक सुविधा मार्गावरील थेऊरफाटा शेजारी असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला तब्बल ५ ते १० फूट खोल भगदाड पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच पुलाच्या काही भिंतींना तडे गेल्याचेही निदर्शनास आले असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीनंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी भगदाडाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून खबरदारीचे उपाय करण्यात आले.
सभापती काकडे यांनी सांगितले की, उड्डाणपुलाच्या भिंतींना तडे गेले असून अनेक ठिकाणी झाडे उगवलेली दिसून आली आहेत. ही बाब पुलाच्या संरचनात्मक मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष रस्ते प्रकल्प विभागाने तातडीने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हा मार्ग पुणे-सोलापूर महामार्ग आणि पुणे-नगर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज हजारो लहान-मोठी वाहने, तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. शिवाय थेऊर येथील अष्टविनायक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असल्याने या मार्गावरील वाहतूक नेहमीच वर्दळीची असते.
विशेष म्हणजे, या उड्डाणपुलाखाली रेल्वेची उच्च क्षमतेची विद्युत वाहिनी असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यास तिचे परिणाम अत्यंत गंभीर ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने वेळ न दवडता तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























