पुणे:
पोल्ट्री व्यवसायाचे आमिष दाखवून आणि घरगुती कार्यक्रमाचे कारण सांगून फिर्यादीच्या पत्नीचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण घेऊन त्याची मणप्पुरम गोल्ड लोनमध्ये परस्पर विल्हेवाट लावणारा आणि गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. दत्ताञय बबन तावरे (वय ३७ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला सानपाडा, नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी दत्ताञय बबन तावरे (मूळ रा. १६१०, कोल्हेवाडी, रेठरे बु. ता. कराड, जि. सातारा, सध्या सर्व्हे नंबर ०९, तुकारामनगर, खराडी, पुणे) याने १८ डिसेंबर २०२२ रोजी फिर्यादीचा विश्वास संपादन करून पोल्ट्री व्यवसायासाठी ५०,०००/- रुपये घेतले होते. त्यानंतर, एका घरगुती कार्यक्रमाचे कारण पुढे करून फिर्यादीच्या पत्नीचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण अवघ्या दोन दिवसांसाठी वापरण्यास मागून घेतले.
परंतु, हे दागिने परत न करता आरोपीने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी चंदननगर येथील मणप्पुरम गोल्ड लोन शाखेत ते परस्पर गहाण ठेवले आणि त्यावर १,२९,५००/- रुपयांचे सोने तारण कर्ज काढून फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनेक जणांना लावला चुना
पोलीस तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी दत्ताञय तावरे याने केवळ एकाच व्यक्तीला नाही, तर याच पद्धतीने आणखी ०३ साक्षीदारांची देखील आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अस्तित्व बदलून दोन वर्षे होता फरार
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी दत्ताञय तावरे याने तात्काळ त्याचे राहते पत्ते बदलले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी त्याच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि बँक खाती देखील वापरणे पूर्णपणे बंद केले होते. पोलीस पथकाने त्याच्या सर्व संभाव्य पत्त्यांवर जाऊन शोध घेतला, परंतु तो आपले अस्तित्व (ओळख) बदलून वावरत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
अशी झाली अटक
वरिष्ठांनी या गंभीर गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) महेश लामखडे आणि पोलीस अंमलदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा माग काढला आणि तो सानपाडा, नवी मुंबई येथे लपून बसल्याची माहिती मिळवली.
माहिती मिळताच १४ मे २०२६ रोजी सपोनि महेश लामखडे व पोलीस अंमलदार विक्रम गायकवाड यांचे पोलीस पथक नवी मुंबईला रवाना झाले. त्यांनी सानपाडा परिसरातील स्थानिक भाग पिंजून काढला आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अखेर सानपाडा गावंठाण येथून दत्ताञय तावरे याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सपोनि लामखडे करत आहेत.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कामगिरी:
ही यशस्वी कामगिरी पुणे शहरचे माननीय अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, माननीय पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०७) श्री. सोमय मुंडे, माननीय सहायक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) श्रीमती नुतन पवार, आणि चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार किरण घुटे आणि विक्रम गायकवाड यांनी मोलाची भूमिका बजावली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























