मुळा रोडवरील निकृष्ट दुरुस्तीचे काम; काँग्रेसचे सचिन भोसले यांनी छावणी परिषदेवर ताशेरे
मुळा रोड (खडकी) येथे काही दिवसांपूर्वी छावणी परिषद खडकी (Khadki Cantonment Board) यांच्या वतीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य पद्धतीने केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे वडगावशेरी ब्लॉक उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले यांनी केला आहे.
दुरुस्ती करूनही रस्त्याच्या संपूर्ण कडेला मोठ्या प्रमाणात खडी, दगडांचे तुकडे आणि कच जमा आहे. या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अनेकदा घसरण्याच्या घटना घडल्या असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेला साचलेली ही खडी भविष्यात मोठा अपघात घडवू शकते, असा गंभीर इशाराही भोसले यांनी दिला.
या परिस्थितीचा त्वरित आढावा घेऊन काँग्रेसचे सचिन भोसले यांनी छावणी परिषद खडकी प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात रस्त्याच्या कडेला पडलेला संपूर्ण खडी-कचरा तातडीने हटवून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात विलंब झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
सदर दुरुस्तीचे काम कोणत्या कंत्राटदारामार्फत करण्यात आले आणि त्यावर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. “नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी,” अशी मागणीही भोसले यांनी केली आहे.
येजा करणाऱ्या नागरिकांनीही काँग्रेसच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवित, प्रशासनाने दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























