उद्धट वर्तन, आरटीओची १७४ रिक्षाचालकांवर कडक कारवाई
पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २५ फेब्रुवारी २०२६ : प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे न आकारता मनमानी पद्धतीने पैसे उकळणे, जादा प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, उद्धट वर्तन करणे तसेच ‘मीटर फास्ट’ ठेवणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणेने जानेवारी २०२६ मध्ये विशेष मोहीम राबवली.
यामध्ये तब्बल ४७७ ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १७४ रिक्षाचालक नियमभंग करताना आढळले. दोषी आढळलेल्या चालकांवर कडक कारवाई करत सहा रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच उर्वरित चालकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तपासणीदरम्यान जादा भाडे आकारणाऱ्या २९ प्रकरणांची नोंद झाली. ‘मीटर फास्ट’ ठेवून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या १० चालकांवर कारवाई करण्यात आली. जादा प्रवाशी घेणाऱ्या एक, भाडे नाकारणारे १०, उद्धट वर्तन करणारे १७ तसेच इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा समावेश असून, एकूण १७४ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरात वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरटीओने ही मोहीम हाती घेतली होती. कोणत्याही ऑटो रिक्षाचालकाने नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक तसेच परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल. जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे, मीटर फास्ट असणे किंवा उद्धट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि संबंधित रिक्षाचा फोटो ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा. प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.
*रिक्षावाले आकारतात अधिक भाडे*
सध्या ओला, उबेर या ॲपवरून रिक्षा बुक केल्यानंतर त्यात जे नियमानुसार भाडे आहे, ते सुरुवातीला दिसते. परंतु, जेव्हा रिक्षा घरासमोर येते, तेव्हा मात्र रिक्षावाले मीटरने भाडे आकारू, असे सांगतात. त्यावर ग्राहक आणि त्यांचा वाद होतो. जर मीटरवर भाडे आकारायचे असेल तर मग ॲपमधून बुकिंग कशाला केले जाते. यावर शहरभर वाद सुरू आहे. त्यामुळे याविषयी आरटीओने देखील लक्ष देऊन असे प्रकार होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























